होय, चढवा माझे नाव रविंद्रच्या खुनाच्या एफ.आय.आर.वर…

ravindra-patil-second-last
रविंद्र पाटील याची  छायाचित्रे ravindra-patil
संग्रहित व्यंगचित्र
संग्रहित व्यंगचित्र

रविंद्र, मित्रा तुझे मनःपूर्वक आभार… रविंद्र पाटील, अरे तुझ्या कष्टाचे चीज झाले. न्यायालयाने तुझी प्रथम दिलेली साक्ष मान्य केली. तुझ्या मरणाची लाज न्यायालयाने राखली रे. हो, तू मरणाआधी दाखल केलेला एफ.आय.आर. तुझ्या ‘हितचिंतकांना’ पुरून उरला… त्याला शिक्षा जाहीर झाली आणि तो दोन दिवसात स्थगिती आणून सुटला ही… हे होणारच होते, तो न्यायदेवतेच्या कुशीतून पळ काढून पुन्हा हिरो होणारच होता रे… पण त्याला शिक्षा सुनावली हे महत्वाचे, ती पण तू दाखल केलेल्या एफ.आय.आर मुळे…

पण, साला तुझ्या खुनाबद्दल कुणी एफ.आय.आरच केला नाही रे? तुझे कुटुंबीय, तुझी आई, तुझी बायको हे तर तुझ्या मृत्यूच्या दिवशी तुझ्या सोबतही नव्हते तर, एफ.आय.आर कधी दाखल करतील बिचारे. होय, बिचारेच ते… त्यांना तरी तुझा दुरावा कुठे सहन झाला होता… पण मित्रा या व्यवस्थेची खरी ओळख विसरलास तू… ज्यादिवशी एफ.आय.आर दाखल केलास ना, त्याच दिवशी तुझे स्मशानाचे दार यांनी उघडले आणि घराचे दार बंद केले होते. तुझ्या वाट्याला आलेले नैराश्य आणि मृत्यू हे तुला तुझ्या एफ.आय.आरनेच आंदण म्हणून दिले होते. त्यांनी बरोबर तुझा गेम केला. म्हणून तर घाबरून घर सोडून पळून गेलास…

बायकोला चोरून भेटायला यायचास तू, काय रे गप्पा मारत असाल तुम्ही दोघं? तिचा फुलांचा हट्ट, बागेतला फेरफटका, प्रेमाचे दोन क्षण हे पुरवायचं राहूनच गेलं असेल न रे…. हाहाहा… खरं सांग हं! का तिच्या मांडीवर डोकं ठेऊन रडायचास तू, मायेने जवळ घेतला का रे तुला कोणी घरात? तरी तुला घरचे सांगत होते ना, या सगळ्यातून बाहेर पड, पण ऐकलस कुठे तू घरच्यांचं. साक्ष फिरवलीच नाहीस… व्यवस्थेचे ठेकेदार तुझ्या बोकांडीच बसले होते, असं कळलं होतं मला पेपरातून. म्हणून म्हणे तू घाबरून नोकरीवर देखील नाही जायचास, त्यामुळे बडतर्फ पण झाला नोकरीतून… घाबरून कोर्टात तरी कुठे गेलास? कोर्टात गेला नाहीस म्हणून तुला अटकच केली ना रे त्यांनी. सराईत गुन्हेगारांसोबत ठेवलं तुला, कारण त्याच्या विरुद्ध तू एफ.आय.आर केला होतास. मग भोग आता, सराईत गुन्हेगारच तू व्यवस्थेच्या दृष्टीने. आंधळेच ते पण, हो म्हणजे न्यायदेवता खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून आंधळी आणि व्यवस्था पैश्याच्या झापडाने आंधळी. मग दबाव तर तुझ्यावर राहणारच ना…

..आणि मग दिलं तुला रस्त्यावर भिक मागायला सोडून… काय रे आठवलं तेव्हा तुला, रस्त्यावर भिक मागताना लहानपणी आईकडे केलेले हट्ट, मस्ती, शाळेतली मज्जा, मित्रांसोबतची धमाल… का नेहमीप्रमाणे भ्रांत पडली होती फक्त पन्नास रुपयांची. जे घेऊन तुला रुग्णालयात जायचं होतं, टीबीसाठी… हो, तुला टीबी झाला होता तेव्हा, खूप दारू पण प्यायला लागला होतास तू… टीबीच्या खोकल्याची तुला जोरदार उबळ येत असेल ना, तेव्हा जिथे असेल तिथे तुझ्या आईने नक्की जीभ चावली असेल बघ…

लोक म्हणतात, नैराश्य आल्यावर दारू प्यायला लागलेल्या माणसाला टीबी होणार नाही तर मग काय होणार… दारू पिणाऱ्यांच असंच होतं… पण मी समर्थन करतो तुझ्या दारू पिण्याचं, त्या लोकांना तरी काय माहित, तू रस्त्यावर आला होतास, तुझ्याजवळ तुझी आई, बायको, कुटुंबीय नव्हते आणि हे का? तर तू खरं बोलला होतास म्हणून… एफ.आय.आर दाखल केलास ना म्हणून… आणि इथे या लोकांची ओरड की तू गायब झालास म्हणे, पळून गेला साला, बरे झाले सुंठीवाचून खोकला गेला…

पण तू तर, भिकेच्या पन्नास रुपयांच्या कमाईतून पालिकेच्या रुग्णालयात पोहचला होतास… खंगून खंगून तिथेच मेलास… मरायच्या दोन क्षण आधी आयुष्याची तिशीतली उणीपुरी वर्ष एका चित्रपटाप्रमाणे समोरून गेली असतील तुझ्या, तुला टीबीमुळे असंख्य यातना झाल्या असतील, तुला आई आठवली असेल, नक्कीच आठवली असेल… तुला आई तरी सोबत हवी असेल तेव्हा, पण तेव्हा आई काय कुटुंबीयही नव्हतेच सोबत तुझ्या, पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे, रोज मृत्युच्या शंभर घटना बघणाऱ्यांचे भावनाशून्य चेहरे तुझ्या आजूबाजूला असतील, फक्त थोडेसे हसू असेल तुझ्या चेहऱ्यावर, खरे बोलल्याचे आणि तितक्यात ती शेवटची, जीवघेणी उबळ जोरात आली असेल आणि तू………

न्यायदेवता त्याला धडा शिकवणारच, आज नाही तर उद्या… माझा विश्वास आहे न्यायदेवतेवर, ती पळवाट त्याला तुरुंगातच नेणार हे नक्की… पण तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांची नाव काढायची तर, खूप मोठी यादी होईल रे, या समाजातल्या लोकांची. ज्याचं तू संरक्षण करत होतास त्याचं नाव की ज्यांनी दबाव टाकला त्यांचं नाव, ज्यांनी तुला घरापासून तोडलं, ज्यांनी तुला पळपुटा केलं आणि ज्यांनी तुला मारलं… आमच्या सारखे लाखो नागरिक तुझा निष्पाप मृत्यू टीव्हीवर बघत राहिले त्यांचं नाव… अशी किती नावं लिहायची एफ.आय.आर.वर, या समाजातल्या लोकांची… समाज, हाहाहा… किती जड शब्द आहे हा, पुरोगामी असल्याचं बिरूद वगैरे घेऊन हा शब्द स्वतःची पाठ थोपटवून घेत असतो नेहमी… पण तुझ्या मृत्यूत हा समाजच खरा दोषी आहे, त्याने त्याचं प्रतिगामित्व पुन्हा सिध्द केलं आहे. अरे या समाजानेच तुझी निर्घृण हत्या केली आहे…

आहे का मग हिम्मत या समाजतल्या कोणाची, रविंद्र च्या एफ.आय.आर.वर खुनी म्हणून नाव लिहिण्याची… कोणाला तरी या समाजाचा प्रतिनिधी म्हणून पुढे यावेच लागेल. कोणी नसेल घेत पुढाकार तर, मी घेतो हा पुढाकार, चढवा माझे नाव एफ.आय.आर.वर… या नालायक समाजाचा प्रतिनिधी म्हणून…

Advertisements
कँम्पस कॉर्नर अभियान - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

कँम्पस कॉर्नर अभियान – विद्यार्थ्यांच्या जाणिवांना हात घालताना…

महाराष्ट्रातील आजवरपर्यंतच्या राजकारणात विद्यार्थी संघटनांना ध्रुवासारखे अढळ स्थान आहे. राजकारणातील नेतृत्व निर्मितीचे कारखाने म्हणून या विद्यार्थी संघटनांकडे पाहिले जाते. विद्यार्थी दशेत केलेल्या चळवळीतून शरद पवार, प्रमोद महाजन व अगदी आत्ता – आत्ताचे विनोद तावडे, जितेंद्र आव्हाड आदींनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला चांगला ठसा उमटवला आहे. अलीकडच्या काळात काही कारणांमुळे मागे पडलेली ही विद्यार्थी चळवळ आगामी विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा मूळ धरू पाहतेय. याचे आत्ताचे उदाहरण पाहायचे म्हणजे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आयोजित ‘राष्ट्रवादी कँम्पस कॉर्नर – विद्यार्थ्यांच्या जाणिवा जागर’ अभियान. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभलेल्या या अभियानाच्या निमित्ताने…

     पथनाट्य, फ्लॅश मॉब, पोस्टर प्रदर्शन या समाजात भूमिका मांडण्याची संधी देणाऱ्या माध्यमांचा वापर, समाजोपयोगी संदेश देण्यासाठी होत असताना आपण नेहमी पाहत असतो. कधी चौका – चौकात तर कधी महाविद्यालयांच्या आवारात तरूण मंडळी पथनाट्य सादर करताना हमखास दिसतात. परंतु, आता या माध्यमांद्वारे महाविद्यालयांच्या तरुणांमध्ये राजकीय व सामाजिक जागृती करण्याचे काम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केले आहे. पारंपारिक प्रचाराच्या पध्दतींना छेद देत एक विद्यार्थी संघटना म्हणून आपल्या समवयीन मित्र-मंडळींना आपली राजकीय भूमिका पटवून देतानाच लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचे महत्त्व आणि तरुणांचे हक्क व अधिकार सांगण्याचे काम या माध्यमांद्वारे होत आहे. खा. सुप्रिया सुळेंच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या राष्ट्रवादी कँम्पस कॉर्नर – विद्यार्थ्यांच्या जाणिवा जागर अभियानाने संपूर्ण महाराष्ट्रातील दीड हजार महाविद्यालये सहाशे विद्यार्थ्यांच्या साथीने पालथी घातली आहेत. राज्यातील १४० विधानसभा मतदारसंघांचा फेरा या अभियानाने पूर्ण केला आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर एका विद्यार्थी संघटनेने निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर उघडलेली आघाडी व ७ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या वीस दिवसातच संपूर्ण राज्यभर नियोजनबध्द रितीने केलेले प्रयोग, असे चित्र उभे केल्याने राज्यातील काँग्रेसप्रणीत विद्यार्थी चळवळींना नवी उभारीच मिळणार आहे. संपूर्ण राज्यात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून या अभियानाने एक नवा विक्रमच स्थापन केला आहे. प्रत्येक महाविद्यालयात सादर झालेल्या प्रयोगांना कमीत – कमी अडीचशे व जास्तीत – जास्त एक हजाराहून अधिक तरूणांनी प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांच्या जाणिवांना हात घालण्यात हे अभियान यशस्वी झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेने बऱ्याच दिवसांनी ठोस भूमिका घेत एक चांगला कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना दिला आहे.

     या अभियानाची प्रमुख उद्दीष्ठे म्हणजे, विद्यार्थ्यांना अगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व पटवून देणे व लोकशाही प्रक्रियेमध्ये तुमचा सहभाग किती गरजेचा आहे, याची जाणीव करून देणे. याचबरोबरीने महाविद्यालयीन निवडणुका विद्यार्थ्यांच्यादृष्टीने किती आवश्यक असून या निवडणुकांची सुरूवात लवकरात – लवकर करावी अशी महत्वाची मागणी या अभियानाच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकांच्यावेळी इंटरनेट व फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मिडियाने प्रचारात घेतलेली आघाडी व त्याचा देशाच्या जनतेवर झालेला परिणाम दाखवून देत, सोशल मिडियाचा वापर सबुरीने करण्याचा व कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सद्सद्विवेक बुध्दीने आपल्या मतांना आकार देण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला या अभियानाने  राज्यातील तरूणांना दिला आहे.

     कँम्पस कॉर्नरसारख्या अशा कार्यक्रमांची विद्यार्थ्यांना सध्या नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असतात. विद्यार्थीदशेत समोर आलेल्या अशा अनेक उपक्रमांच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या राजकीय विचारांची निर्मिती प्रक्रिया सुरू होत असते. या विचारांच्या आधारावरच विद्यार्थी आपली राजकीय गृहीतके ठरवत असतात आणि पुढे मग या गृहीतकांच्या जोरावर समूहाचे नेतृत्व करू लागतात. थोडक्यात, महाविद्यालयीन आयुष्यात विद्यार्थी संघटनांमध्ये नोंदवलेला सहभाग विद्यार्थ्यांना राजकीयदृष्ट्या परिपक्व करून जातो. परंतु, सध्या राज्यातील तरूणाईकडे पाहिले तर, कपाळावर लाल गंध व गळ्यात बऱ्याच तोळ्यांची चेन घालून (स्टार्च केलेल्या) पांढऱ्या कपड्यात काढलेला फोटो फ्लेक्स बॅनरवर छापणे आणि येणाऱ्या प्रत्येक सण – सोहळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देणे. म्हणजे आपण यशस्वीरित्या राजकारणात आलो असा अर्थ या तरुणाईला अभिप्रेत आहे, असेच वाटते. कधी कुठे प्रेमी युगुलाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले, क्रिकेटचे सामने आयोजित केले मग कुठे वह्या वाटप आणि रक्तदान शिबीर आयोजित केले म्हणजे आपण राजकीयदृष्ट्या खूप मोठा कार्यक्रम केला असून समाजाचे फार मोठे देणे चुकविले आहे, अशा थाटात ही मंडळी वावरणार. असे विद्यार्थ्यांबाबतचे कटू वास्तव आपल्याला दिसत असते. ठोस राजकीय कार्यक्रमांची वानवा, पक्षाच्या विचारधारेबद्दल असलेले अज्ञान व गैरसमज आणि योग्य मार्गदर्शन न लाभल्याने विद्यार्थ्यांचे राजकारण करण्यापेक्षा राजकारण समजून घेण्याचे दिवस असे संपून चालले आहेत. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने एक ठोस कार्यक्रम घेत पुढे येऊन केलेले हे अभियान विद्यार्थी चळवळीला निश्चितच पोषक ठरणारे आहे.

     पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या अभियानाचे महत्त्व वेळीच ओळखले व या अभियानाला स्वत:च्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविला. याचे मुख्य कारण असे की शरद पवार हे विद्यार्थी चळवळीचे महत्त्व जाणून आहेत. त्यांनी देखील इ. स. १९५६ साली शालेय विद्यार्थी असताना गोवा मुक्ती संग्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा घेत विद्यार्थी संघटनेमध्ये स्वत:ला झोकून दिले होते. एका समारंभात तर त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाणांना आमंत्रित केले होते. यावेळी पवार यांनी केलेल्या भाषणावर प्रभावित होऊन त्यांना युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास यशवंतराव चव्हाणांनी सांगितले होते. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. शरद पवारांच्या या विद्यार्थी चळवळीतील सहभागाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी स्वत:च्या उपस्थितीत या अभियानाला केलेली सुरूवात व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही पुढाकार घेऊन मुंबई येथे या कार्यक्रमाचे केलेले उद्घाटन यांमुळे पक्षाच्या श्रेष्ठींनी या उपक्रमाचे महत्त्व ओळखल्याचे जाणवते.

     राजकारण करताना व समजून घेताना लागणाऱ्या परिपक्वतेसाठी आवश्यक असणारी समज अशाच उपक्रमांमुळे येऊ शकते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही आपल्या राजकीय भूमिका ठरविण्यासाठी अशा उपक्रमांची मदत होऊ शकते. असे उपक्रम राबविण्यासाठी लागणारे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी करत राज्यातील अन्य विद्यार्थी संघटनांपुढे एक प्रचाराचा नवा पर्याय उभा केला आहे.

गझल – नाजूक भावनांची… दु:खाने दिधली मजला…

दु:खाने दिधली मजला विजयाची दहाड आता

मी ही पेलाया शिकलो हे नवखे पहाड आता,

अलवार सुखांनी माझे घरकुल सजविले होते

पण देण्या दु:खा थारा उलगडले कवाड आता,

टाळून खुबीने मजला ती मिरवत निघून गेली

बेरकी खुशीने त्यांचे गजबजते वऱ्हाड आता,

हि अशी राखरांगोळी नशिबाने केली तरीही

बांधेन त्याच राखेतून मी माझे बिऱ्हाड आता,

संकेत काळजामधला जपण्याचा वादा करूनी

ती त्याच काळजावरती चालवते कुऱ्हाड आता

                                                                 – संकेत

माझ्या भावनांचा कल्लोळ मांडणारी व आयुष्यातील काही खऱ्या क्षणांना व्यक्त करणारी ही गझल.  डोळ्यात पाणी येत होतं आणि तेव्हा ह्या ओळी स्फुरत होत्या. तशी भाषा अलंकारिक वापरत जरी असलो, तरी खरं आहे हे सगळं…. बहुतेकांना त्यांची काव्यमय लिखित कृती (कविता, गझल, चारोळी, रुबाई, मुक्तछंद, अष्टाक्षरी) कधी ना कधी इतकी वेड लावून जाते की ही माणसे त्या कवितेच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतात. तसंच काहीसं या गझलेच्या बाबतीत माझं झालं आहे. अगदी शब्दांच्या पलीकडे सांगण्यासारखं असतं ना तसं काहीतरी वगैरे…..

या गझलेला म्हणून मी संगितबध्दच करायचं ठरवलं आणि नुसतंच संगितबध्द नाही तर त्याचा विडीओही करायचं ठरवलं अन् लागलो कामाला. कवी सौमित्र व कवी अरूण म्हात्रे यांचा कार्यक्रम आम्ही घेतला होता. त्यावेळी आलेल्या एका तरूण गायकाची माझी चांगलीच मैत्री झाली होती. तो होता गंधार जाधव. गंधारची आणि माझी मैत्री हळूहळू बहरली होती. गंधारला मी माझ्या गझलेविषयी आणि माझ्या गाणे तयार करण्याच्या मनसुब्याविषयी बोललो आणि त्याला गंधार लगेचच तयार झाला. मग गाणं मीटरमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात सगळ्यात जास्त मदत झाली ती गंधारची बहीण गाथा जाधव हीची. गाथा ह्यांनी या गझलेचा इस्लाह केला आणि आत्ता आपल्यासमोर दिसतेय ती गझल समोर आली. त्यामुळे माझ्याप्रमाणेच गाथा जाधव ह्यांना सुध्दा या गझलेचे श्रेय जाते. पुढे गंधार आणि मी नेहमी डोंबिवलीमध्ये भेटायचो. गझलेप्रमाणेच संगीत क्षेत्रातील अनेक विषयांवर आम्ही चर्चा करायचो. गंधारचे वडील दत्ता जाधव एक नावाजलेले गझलकार व कवी आहेत, त्यांचा कवितासंग्रहही प्रसिध्द झालेला आहे. त्यांनी नरेंद्र दाभोळकरांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली वाहणारी गझल लिहीली व गंधारने ती संगितबध्द करत त्याचा एक विडीओ तयार केला. त्याचा कळव्याचा मित्र अभिजित कांबळी याने तो दिग्दर्शित केला होता. मला तो खूपच आवडला. म्हणून एक दिवस माझ्या गझलेच्या विडीओसाठी मी अभिजीतला भेटलो आणि तोही लगेच तयार झाला. बास…. मग आम्ही तिघांनी जोमाने तयारी केली. गंधारने ह्या गझलेला नव्या ढंगात चाल लावली. माझ्यापासून साऱ्यांनाच ती चाल आवडली. कल्याणच्या मयुरेश केळकर यांच्या स्टुडीओमध्ये आम्ही ती गझल रेकॉर्ड केली. मी कल्याणहून निघताना  जामच भावूक झालो होतो. माझा मित्र दिनेश मला त्याची गाडी घेऊन बदलापूरला स्टेशनला घ्यायला आला होता ते खास हे नवं गाणं एेकायला. त्याच्या गाडीत आम्ही ती गझल लावली. शेवटपर्यंत कोणी काहीच बोललं नाही. पण, नंतर दिनेशने गझलेची स्तुती करण्यासाठी बोलायला सुरूवात केली आणि मी भानावर आलोे. माझ्यासाठी ती गझल ह्रदयस्पर्शी होती. मला अपेक्षित असलेलं सारं काही त्या गाण्यात आलं होतं.

 

विडीओ बनवण्याच्या प्राथमिक बैठका झाल्यावर आम्ही पायलट विडीओ म्हणजेच चाचणी घेण्याचे योजले.  माझा मित्र सागर नरेकर आमच्या मदतीला आला होता. तीन डीएसएलआर कॅमेरे, ट्रॉली, प्रॉपर्टीचे सारे सामान यांसह संगितकार व गायक गंधार जाधव,  दिग्दर्शक अभिजीत कांबळी, सह-दिग्दर्शक व अभिनेता सिध्दी तळाशिलकर, मुख्य नायक शिशीर कोरडे, नायिका नम्रता बावदने, कला दिग्दर्शक प्रेरणा शिर्के, शूटींगसाठी संजय सावकारे, अतुल गुरव, सहकारी भावेश नलावडे व मी आणि सागर आणि नम्रताची बहिण अशी बारा जणांची टीम तयार झाली. मला नेहमीच साथ देणाऱ्या व माझ्यामागे सावलीसारखे उभे असलेल्या  नगरसेवक श्रीधर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या फार्महाऊसवर व त्यांच्या घरी असे या चाचणी विडीओचे शूटींग झाले. सगळेच सीन छान जमून आले होते.  हे शूटींग इतके अफलातून झाले होते आणि सगळ्यांनी जीव ओतून काम केले होते की त्यामुळे तयार झालेला कच्चा विडीओ हा प्रथितयश मराठी चित्रपटातीलच आहे की काय याचा भास होत होता.

मी पाहिलेल्या या गाण्याच्या स्वप्नाचा हा पूर्वार्ध रंगविण्यात मला खूप आनंद आणि यश मिळाले आहे. अजून या स्वप्नाचा उत्तरार्ध बाकी आहे, म्हणजे अंतिम शूटींग, एडीटिंग, प्रसिध्दी करायचे आहे. या गझलेला मला अनेकांपर्यंत पोहचवायचे आहे. मी या गझलेच्या बाबतीत माझा मित्र कुणाल गायकवाड यांस नेहमी म्हणतो. माझ्या स्वप्नाला अजरामर झालेले मला बघायचे आहे रे….. हेच धेय्य उराशी बाळगून मी पुढे चाललो आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी अगदी विनामूल्य झटणारे नवे मित्र मला मिळालेले आहेत.  गंधार जाधव, अभिजीत कांबळी,  सिध्दी तळाशिलकर,  शिशीर कोरडे, नम्रता बावदने, प्रेरणा शिर्के, संजय सावकारे, अतुल गुरव यांच्या  ऋणात आहे मी. अभिजीत तुझ्या वडीलांची तब्येत लवकर बरी होवो….. आपण सगळेच लवकर भेटूयात…..

 

 

 

चार ओल्या रेघा…

IMG_0716 - Copy

सुखाच्या शाेधात असलेल्या मला तसे, सुखे सापडता -सापडता खाचखळगे आणि खोल खड्डेच सापडले आहेत. तरी, आजतागायत माझा सुखांच्या पाठी असलेला प्रवास काही थांबलेला नाही. माझ्यासारखीच अवस्था या जगात अनेकांची असेल…. त्यांचाही प्रवास सुखांच्या पाठी असाच चालू असेल…. अव्याहत…. बहुतेक आजन्मच….  या अनेकांचा सुखांच्या पाठी चालू असलेला प्रवास मांडणारी ही ‘कविता’….

सुखे शोधतो अजूनही
घोर दुःख्खाच्या वळचणीला
सापडते मजला तेथे
काट्यांची पोतडी तुडुंब भरलेली……
युगांचाच प्रवास माझा
चालू सुखांच्याच पाठी
प्रवासात सापडते मजला
टोळी श्वापदांची नखांनी ओरबाडणारी……
दोन दुःख्खांच्या फटीत
दिसते ओली रेघ
सापडते मजला तेथे
आईच्या छातीची ऊब विसाव्यासाठी……
युगे चालून झाल्यावर
मागे वळून पाहतो
दुःख्खाच्या निबिड काळोखात
दिसते सुखाची रेघ विजेसारखी……
चारी युगे जगून
होईल अंत माझा
होईल गणना सुखाची
फक्त चार ओल्या रेघा……

  • संकेत

ब्लॉग लिहीताना…

ब्लॉग लिहीण्याची ही तशी पहिलीच वेळ. म्हणून ब्लॉगला सुरूवात करण्यीपूर्वी तो सुरू करण्यामागची मनोभूमिका इथे मांडतोय. तशी लिहीण्याची हौस म्हणून पत्रकारितेत शिरलो. पुण्याच्या रानडेमध्ये शिकत असताना अनेकदा बोलण्याचा,  लिहीण्याचा प्रसंग आला, अनेकदा समूहामध्ये बसून चर्चा झाल्या. पण या सगळ्यामध्ये मी म्हणावा तितका कधी सहभागी झालोच नाही. मनात मांडण्यासारखे बरेच काही होते. पण गरज भागवण्याखेरीज विशेष काही मला मांडता आले नाही. हांं…. तसा गझल व कविता यांवरील प्रेमामुळे व माझ्याच काही रचनांमुळे मला इतरांपुढे व्यक्त होता आले. पण, चर्चा, लेखन, वाचन, व्यक्तिगत मत मांडणे यांपासून थोडा दूर राहिलो.  साहित्याची आवड असूनही मी यात विशेष सहभागी झालो नाही याचं शल्य माझ्या मनाला टोचतंय. साहित्याच्या जोरावरच पत्रकारितेत पुढे जायचं असताना त्याचा वसा जपण्याचे दिवस उराशी बाळगायचे असताना मी असे मागे राहून चालणार नाही.  म्हणूनच मनातल्या काही गोष्टी, यापूर्वी मांडलेलं आणि न मांडलेलं असं बरच काही….आणि हो साहित्याशी निगडीत नविन लिखाण सुध्दा या ब्लॉगच्या माध्यमातून मला मांडायचं आहे. गझलेवरील प्रेमाने मला दिलेली ओळख व सुरेश भट साहेबांच्या वाचनाने मिळालेली प्रेरणा यांची बूज राखत नव – नव्या रचना जशा स्फुरतील तशा इथे लिहीणार आहे. तसेच पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक उपक्रम यांवरील माझी श्रध्दा जपत त्यांच्याबद्दल असलेली आवड मी या ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त करणार आहे. थोडक्यात, जास्त ताणून न सांगता, स्पष्टंच सांगतोय की….. साहित्य, समाजकारण, राजकारण याबद्दल मनात असलेल्या आस्थेमुळे आणि अंतरीच्या वेदनांना, भावनांना, वेगवेगळ्या विचार व मतांना वाट करून देण्यासाठी मी माझ्यासाठी माझ्या हक्काचं  व्यासपीठ सुरू करतोय. माझ्या या प्रक्रियेत आपणही सारे सहभागी व्हा. फार लिहीत नाही इतक्यातच. अजून बरेच मैल पुढे जायचं आहे मला… आज ३-९-२०१४….. ब्लॉगला सुरुवात करतो….. Get Set Go…